पुणे प्रतिनिधी | सेना भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या अधिच ठरला आहे. या फॉर्म्युल्यावर आता वाटाघाटीच्या वेळी बदल होऊ शकतो असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. याआधी चंद्रकांत पाटील यांनीच भाजपने सेनेला दिलेला शब्द पाळला जाईल असे भाष्य केले होते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांची भाषा बदललेली दिसते आहे.
आमच्या वाट्याला येणाऱ्या १४४ जागा आम्हाला द्या आणि तुमच्या वाट्याला येणाऱ्या १४४ जागांमधून मित्र पक्षाला जागा द्या असा कयास शिवसेनेने भाजपपुढे ठेवला आहे. मात्र भाजपला हा फॉर्म्युला कदापी मान्य होणार नाही. कारण शिवसेनेला देखील आपल्या वाट्याच्या काही जागा या मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागणार आहेत. तर भाजप शिवसेनेच्या अशा तुसट वागण्यावर नाराज असल्याचे बोलले जाते आहे.
लोकसभा ३०३ जागांसहित जिंकलेल्या भाजपला विधानसभा विजयाची चांगलीच खात्री असल्याने शिवसेनेला जागा वाटपात दबावाखाली घेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्याची सुरुवात काल चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून केली आहे. तर मागील काही दिवसापूर्वी रावसाहेब दानवे देखील म्हणाले होते कि २०१४ साली जिंकलेली एक ही जागा भाजप शिवसेनेला सोडणार नाही. या दोन बड्या नेत्यांच्या वक्तव्यावरून भाजप शिवसेनेशी दबावतंत्राची चाल खेळत आहे असे दिसून येते आहे.