मुंबई । कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. खुद्द नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे.
नाना पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि,”गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूर परिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये” असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
याशिवाय ”गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन” असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, ऐन विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने अधिवेशनावर कोरोनाचे सावट आणखी गहिरं झालं आहे.
/2 = गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 4, 2020
असं पार पडणार विधानसभेचं पावसाळी अधिवेशन
राज्यातील कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोनदा पुढे ढकलण्यात आलं होतं. विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या बैठकीत कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल. सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल. इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत.
अधिवेशनासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, सभागृहासह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून माजी सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.