हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात उद्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्याच्या बंद मध्ये अनेक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या सेवांवर परिणाम होणार? Maharashtra Bandh
महाराष्ट्र बंदचा सर्वात मोठा परिणाम हा दळणवळ्णावर होऊ शकतो. एसटी बस आणि रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसू शकतो. २-३ दिवसांपूर्वी बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता, त्यामुळे उद्याही महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेवर परिणाम होईल असं वाटतंय. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते त्यामुळे एसटी सेवाही काही ठिकाणी ठप्प होऊ शकते. या बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. दूध, भाजीपाला मार्केट, किराणा दुकाने बंद असतील. तसेच हॉटेल्स सुद्धा बंद असू शकतात. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे, त्यामुळे या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
बंदमध्ये सहभागी व्हा – उद्धव ठाकरे
मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद (Maharashtra Bandh) पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महाराष्ट्र बंदमध्ये राजकारण नाही – नाना पटोले
बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केला आहे. हि संस्था भाजप आणि आरएसएसची असल्याने त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. महायुतीला या घटनेचं काहीही घेणंदेणं नसून सत्तेची गुर्मी त्यांच्यात आहे. आम्हाला यामध्ये राजकारण करायच नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा लावायचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. या बंद मध्ये महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहोत. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकाराला आरसा दाखवायचा प्रयत्न करू असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.