हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात उद्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वानी सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसेच हा बंद किती वाजेपर्यंत असेल याची माहितीही ठाकरेंनी दिली आहे. सणाचे दिवस असल्याने उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते आज मातोश्रीवरील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, उद्याच्या बंद (Maharashtra Bandh) हा महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. पालकांना वाटतं की मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? कार्यालये – रुग्णालये याठिकाणी आपण सुरक्षित राहू का? यावरून माता भगिनींना अस्वस्थ वाटतं आहे. या अस्वस्थततेला वाचा फोडण्यासाठी हा बंद आहे. महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडीचा बंद नाही तर संपूर्ण जनतेचा बंद आहे. त्यामुळे सर्वानी या बंद मध्ये सहभाग घ्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल.
अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवा – Maharashtra Bandh
ते पुढे म्हणाले, उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा, कारण सणाचे दिवस आहेत. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा. परंतु या काळात अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, मग ती पेपर, अग्निशमन दल किंवा आरोग्य सेवा असो त्या सर्व सुरळीत चालुद्या. राज्यातील दुकानदारांनी मात्र उद्या हा बंद पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. पोलिसांनी या बंदच्या आड येऊ नये. नागरिकांना शांततेत बंद करू द्या असं आवाहन ठाकरेंनी पोलिसांनाही केलं.