मुख्यमंत्री ठाकरे आज काय बोलणार? रात्री ८.३० वाजता साधणार जनतेशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत असून आज रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री पुन्हा एकदा राज्याला संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्याला कोणता संदेश देतात?, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. काही लॉकडाऊन-४ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच जनतेला संबोधित करत असून करोनाची साथ आणि आर्थिक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्राला ते कोणती नवी वाट दाखवतात हे पाहावे लागणार आहे.

दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एका बैठकीत राज्यात लॉकडाऊनचा काळ ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकृत घोषणेमध्ये मात्र लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरुप नेमकं कसं असणार आहे याची अधिक स्पष्टोक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळं आता लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी मुख्यमंत्री नेमकी काय माहिती देतात आणि कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

देशात चौथा लॉकडाऊन जाहीर करताना काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. रेडझोनमध्ये लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी कायम ठेवताना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय त्या त्या राज्यांनाही याबाबत काही अधिकार देण्यात आले आहेत. ते पाहता मुख्यमंत्र्यांचा आजचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

राज्यात करोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे? लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते नियम असणार आहेत? ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये कोणत्या नव्या सवलती मिळणार आहेत?, रेड झोनमध्ये कंटेनमेंट झोन वगळून बाकी भागात कोणत्या अधिकच्या सेवा सुरू होणार आहेत?, राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी आणखी कोणत्या सवलती दिल्या जाणार आहेत?, प्रवासी वाहतुकीबद्दल कोणता निर्णय सरकार घेणार आहे?, असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संबोधनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment