कोल्हापूर । मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिलं आहे. कोल्हापूरात धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद पार पडली, या परिषदेनंतर धनगर समाजाच्य नेत्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी आपली भूमिका सांगितली.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, धनगर समाजाने गोलमेज परिषद कोल्हापूरात घेतली याचा आनंद, छत्रपती घराणे आणि धनगर समाजाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. चौंडीच्या कार्यक्रमातही मी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आजदेखील धनगर समाजाचे नेते राम शिंदे भेटण्यासाठी आले, त्यांच्याकडून प्रश्न समजून घेतला आहे. केंद्र सरकारकडे धनगर समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचसोबत बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत असंही त्यांनी सांगितले.
याशिवाय कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद झाली, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवतायेत, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणावरही संभाजीराजेंनी लक्ष घालावं, मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन संभाजीराजेंनी धनगर समाजाला दिल्याचं राम शिंदे यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.