खाऊ गल्ली | श्रावण मास संपला की खवय्यांच्या चिभेला मटणाची ओढ लागते. म्हणूनच आम्ही ही आमच्या वाचकांसाठी कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहे.
साहित्य : बारीक चिरलेला कांदा , तेल, चक्री फुल, मसाला पूड, आले लसूण पेस्ट, पांढरी मिरीपूड, पाव किलो मटण,१ वाटी काजू, खसखस, सुके खोबरे, ओल्या खोबऱ्याचे घट्ट दूध १ वाटी, चवीनुसार मीठ
कृती : पांढरा रस्सा बनवण्यसाठी सर्वप्रथम १ वाटी काजू खसखस आणि सुके खोबरे हे एकत्रित वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. त्यानंतर लवंग, दालचिनी, शहाजिरी,धने हे समप्रमाणात घेऊन त्याची पूड करून घ्यावी. याचा उल्लेख साहित्यात मसाला पूड असा केला आहे. पांढरा रस्सा बनवण्याची हि सर्व पूर्व तयारी आहे.
गॅसवर एक भांडे ठेवून त्यात दोन चमचे तेल घालावे. त्यानंतर त्यात चक्री फुल टाकावे. नंतर आले लसूण पेस्ट टाकून मंद आचेवर मिश्रण एकजीव करून घ्यावे. लवंग, दालचिनी, शहाजिरी,धने यांच्यापासून बनवलेला मसाला एक चमचा आणि पांढरी मिरपूड त्या फोडणीमध्ये घालून घ्यावे. त्यात मटण घालून तेलात आणि मसाल्यात मटण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्यात काजू, खोबरे खसखस यापासून बनवलेली पेस्ट घालावी. नंतर नारळाचे दूध घालून चवीनुसार मीठ घालावे. पांढऱ्या रस्स्यात काजू घातल्याने रस्सा भांड्याला खाली चिकटण्याची शक्यता असते. तसेच स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचा नारळ दुधासाठी नवापरल्यास रस्सा फाटण्याची शक्यता असते. म्हणून सर्व जिन्नस उत्तम प्रतीची घ्यावी. तसेच सर्व सामग्री रश्यात घालून झाल्यावर मंद आचेवर रस्सा उखळू द्यावा. मटण शिजल्यानंतर रश्याचा आस्वाद घ्यावा.