राज्य शासनाने सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड केला निश्चित; आता ‘हे’ कपडे परिधान करता येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्य शासनाने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लगेचच जारी करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शासनाच्या सेवेतील कर्मचारी व अधिकारी तसेच कंत्राटी तत्वावर कार्यालयांत नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी व सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांसाठीच हा ड्रेसकोड बंधनकारक राहणार आहे.

मंत्रालय तसेच सर्व शासकीय कार्यालयांतून सरकारचा कारभार चालवला जातो. ही कार्यालये एकप्रकारे राज्य शासनाचे जनमानसातील प्रतिनिधी असतात. या कार्यालयांत सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी यांची येजा असते. अशावेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अत्यंत महत्त्वाची ठरते. संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची एक विशिष्ठ छाप भेट देणाऱ्या अभ्यागतांवर पडते. त्यामुळेच या सर्वांची वेषभूषा शासकीय कार्यालयाला अनुरूप असावी यासाठीच ड्रेसकोड निश्चित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

एकूणच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदर कामकाजावर होतो आणि त्याने जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे.

ड्रेसकोडबाबतचे दिशानिर्देश:

१)सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय असावा.

२)पेहराव नेहमी व्यवस्थित असावा. महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅण्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅण्ट/ट्राऊझर पॅण्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.

३)आधीच्या सूचनेनुसार खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

४)परिधान केलेले पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.

५)कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे.

६)महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅण्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅण्डल यांचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करू नये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’