मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासात आमदारांच्या अपीलावर सुनावणी घेऊन अध्यादेश रद्द करण्यात आला. यामध्ये काँग्रेसची आक्रमक भूमिकाही कारणीभूत ठरली आहे.
केंद्र सरकारन गेल्या जून महिन्यात कृषी कायद्यासंदर्भातील अध्यादेश काढला होता. यानंतर सर्व राज्यांना केंद्राच्या वतीने पत्र पाठवून या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यानुसार महाराष्ट्रात या वटहुकूमानुसार अंमलबजावणी करावी, असे आदेश राज्य सरकारच्या पणन विभागाच्या वतीने काढण्यात आले होते.
अध्यादेश रद्द करण्याच्या निर्णयासंबंधी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे की, “हा केंद्राचा कायदा आहे. यावर कायदेशीर सल्ला घेण्यात आला होता, आत्तादेखील घेत आहोत. सध्या तरी आम्ही अध्यादेश रद्द केला आहे. अभ्यास करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा नवीन कायदा करणार आहोत”.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भातील केंद्र सरकारच्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश गेल्या ऑगस्ट महिन्यात काढण्यात आल्याने महाविकास आघाडीची पंचाईत झाली होती. त्यातूनच या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अध्यादेशाला स्थगिती दिली नाही तर कॅबिनेटला अनुपस्थित राहण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.