मुंबई । मिशन बिगेन अगेन मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झाला असून आतापर्यंत ५५ हजार २४५ उद्योगांनी उत्पादन सुरु केले आहे. तर १३ लाख ८६ हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिली. राज्यातील तरुणांना उद्योगांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी वेगळे एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल सुरू करत असल्याची घोषणाही उद्योगमंत्र्यांनी केली.
लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात परतले आहेत. राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल सुरु करण्याची घोषणा उद्योगमंत्री देसाई यांनी केली. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांतून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ पुरवले जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई आणि लगतच्या महापालिका तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव येथील अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. तसेच निर्यात करणाऱ्या उद्योगांनाही परवानगी दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. शेतीवर आधारित उद्योग आणि संरक्षण दलाला लागणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांनाही परवानगी दिली असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.
जेथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी या महिन्यातच आणखी काही उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असेही देसाई म्हणाले. सोबतच राज्यात उद्योग चक्र वेगाने फिरू लागल्याचा दावा उद्योगमंत्र्यांनी केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”