पुणे प्रतिनिधी | यंदाची महाराष्ट्र केसरी विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात भरली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवार पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे.
पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गतविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणी पूर्ण केली असून कटके व बाला रफिक दोघेही डबल केसरी किताब घेण्यासाठी मेहन घेत आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा दहा वजनी गटात होणार असून त्यामध्ये प्रत्येक गटामध्ये माती आणि मॅट अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यापैकी 86 ते 125 वजनी गटातील माती आणि मॅट गटाच्या विजेत्या पेहलवानांमध्ये महाराष्ट्र केसरीची कुस्ती होणार आहे. आज (शुक्रवार) गदा पूजन होणार असून शनिवार (दि.4 जानेवारी) पासून कुस्त्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे यावर्षी ‘महाकेसरी’ कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.