सांगली प्रतिनिधी / स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत लागीर झालं जी फेम फास्टर राहुल्या व स्लोवर राहुल्या या दोघांना तब्बल १६ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अमरावती येथील संतोष जामनिक व विलास जाधव या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा इस्लामपूर पोलिसात नोंद करण्यात आला आहे.
इस्लामपूर येथील राहुल जगताप व पेठ येथील राहुल मगदूम यांची कोल्हापूर येथे कृष्णदेव पाटील याच्याशी नोकरीसंबंधी चर्चा झाली होती. कृष्णदेव पाटील याने पुणे येथील अक्षय मिश्रा व विलास जाधव यांना इस्लामपूर येथे २ जून २०१६ रोजी बोलावून घेतले. त्यावेळी राहुल जगताप व राहुल मगदूम या दोघांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावतो असे सांगून प्रत्येकी ८ लाख रूपयांची मागणी केली. त्यावेळी राहुल मगदूम याने १ लाख रोख तर राहुल जगतापने १ लाखाचा चेक दिला. यानंतर राहुल जगताप व राहुल मगदूम यांनी अक्षय मिश्रा व विलास जाधव यांच्याशी फोनवर चर्चा करून वारंवार चेक व रोख रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर प्रत्येकी ८ लाख रूपये अशी १६ लाखांची रक्कम जमा केली.
वारंवार नोकरीसाठी तगादा लावल्यानंतर राहुल मगदूम व राहुल जगताप यांना ७ जानेवारी २०१७ रोजी पुणे येथे बोलावण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लेटरवर त्यांच्या सहया घेतल्या. हे लेटर बँकेच्या अधिकार्यांना देवून तुम्हाला नेमणूकीचे ठिकाण बँकेकडून कळविली जाईल अशी हमी अक्षय मिश्रा व विलास जाधव यांनी दिली. त्यानंतर तब्बल सव्वा वर्षे झाले तरी नेमणूकीचे पत्र आले नाही.
पैसे देवूनही नोकरी मिळत नाही म्हणून राहुल मगदूम व राहुल जगताप यांनी थेट अमरावती गाठली. अक्षय मिश्राकडे विचारणा केली असता त्याने शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देवून दोघांना हाकलून दिले. त्यावेळी अक्षय मिश्रा याचे नाव संतोष जामनिक असे असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची खात्री राहुल मगदूम व राहुल जगताप यांना झाली. याबाबतची फिर्याद राहुल जगताप याने इस्लामपूर पोलिसांना दिली आहे.
इतर महत्वाचे –
विट्यात दीड लाखांची देशी – विदेशी बनावटीची दारू जप्त
अमरावतीत निवडणूक निर्णय अधिका-यांकडून विविध बाबींचा आढावा
नागरीकांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष…