पुणे । सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला अनुदान द्यावे या मागणीसाठी छावा संघटनेचे नेते धनंजय जाधव यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा दुधात ठेवून सरकारला साकडे घातले आहे. छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘एखादं संकट टाळायचं असल्यास देव पाण्यात घालण्याची प्रथा आपल्याकडं आहे. सध्या दुधाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. हे संकट दूर व्हावं म्हणून छावाचे नेते धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिमा दुधात ठेवून अभिनव आंदोलन केलं आहे.
सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच शेतकऱ्यांची समस्या सोडवू शकतात. त्यामुळं त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी छावाने केली आहे. दुधाला प्रति लिटर पाच ते दहा रुपये अनुदान द्या. दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी पाठपुरावा करा,’ अशी मागणी ‘छावा’नं मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठताच उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
संकट जावे म्हणून पुर्वी देव पाण्यात ठेवले जायचे आता शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास आम्ही छावा संघटनेने दुधात ठेवले आहे
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा : छावाप्रमुख धनंजय जाधव#शेतकरीदुधआंदोलन#छावा#CM#UT pic.twitter.com/8t5VHyME4L
— Dr. Dhananjay Jadhav (@DrDJadhavSpeaks) July 21, 2020
दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. त्यांना दिलासा द्यायचा असेल तर राज्य सरकारनं दुधाला लिटरमागे ५ ते १० रुपयांचं अनुदान देणं गरजेचं आहे, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. याच मागणीसाठी काल विरोधी पक्ष भाजप रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर आज सत्ताधारी आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू आहे. सांगली, साताऱ्यासह राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”