टीम हॅलो महाराष्ट्र । राजकीय नेत्यांमध्येही माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कृतीतून दिसून आला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जात होते. याप्रवासात पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या सावंत यांनी आपला ताफा थांबवून प्रोटोकॉल तोडत अपघातग्रस्त जखमी युवकाला मदत केली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात होते. त्यावेळी खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यावेळी त्यांच्यातील डॉक्टर जागा झाला अन् त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या तरूणाची आस्थेने चौकशी केली.
तसेच तात्काळ अपघातग्रस्त तरुणाला उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे काही क्षणातच रूग्णवाहिका घटनास्थळावर पोहचली. जखमी तरूणाला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले. या कौतुकास्पद कामगिरीमुळे खांडेपार आणि आजूबाजूच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, याआधीही अशाचप्रकारे मुख्यमंत्री सावंत यांनी दोन वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना ताफा थांबवून मदत केली आहे.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News