हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्याना पावसाने (Maharashtra Rain) झोडपून काढलं आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाली असून बळीराजाचे हातचे पीक डोळ्यासमोर वाहून गेलं आहे. आजही पावसाचा जोर असाच कायम राहणार असून विदर्भ आणि मुंबईत आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत पावसाचे विघ्न येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस – Maharashtra Rain
विदर्भातच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबईकरांना सुद्धा आज पाऊस (Maharashtra Rain) झोडपून काढू शकतो. हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 25 अंश सेल्सिअस इतकं असेल. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना सुद्धा खबरदारी घ्यावी लागणार आहे.