औरंगाबाद – देशात आघाडीचे वारे वाहत असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात उत्कृष्ट काम करून देशाला दिशा दाखविली आहे. याच धर्तीवर देशातही महाविकास आघाडीचा प्रयोग होईल व त्याचे नेतृत्व राहुल गांधीच करतील, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल केला.
काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा मराठवाडा विभागाचा आढावा मंगळवारी चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसॉर्ट येथे घेण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सचिव संपत कुमार, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला. त्याची परंपरा सुशीलकुमार शिंदे यांनी पुढे चालविली. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. कोविड काळात जगभरात रुग्णांचे हाल झाले. उपचार मिळाले नाहीत, म्हणून बळी गेले. पण आघाडी सरकारने कोरोना काळात अनेक क्षेत्रांत केलेले काम देशात दिशादर्शक ठरले. देशातही महाविकास आघाडीचे वारे आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा देशमुख यांनी केला.