हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahesh Kothare) मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला’ हा सिनेमा तुफान गाजला. एव्हरग्रीन सिनेमांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात. चित्रपटाला खरी मजा आणली ती तात्या विंचू बाहुल्याने आणि त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तात्या विंचू चर्चेचा विषय ठरतो. काही वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग आला आणि तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरु झाले आहे. दरम्यान, महेश कोठारे यांनी पहिल्या चित्रपटाच्या प्रिमिअरची एक खास आठवण सांगितली आहे. महेश कोठारेंनी सांगितले की, ‘झपाटलेला’ हा सिनेमा लंडनमध्ये नेण्यासाठी त्यांना शरद पवारांनी मदत केली होती. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय म्हणाले महेश कोठारे? (Mahesh Kothare)
एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक- अभिनेते महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला’ सिनेमाविषयी काही खास आठवणी सांगितल्या. यावेळी महेश कोठारे म्हणाले, ‘माझा झपाटलेला जेव्हा आला, तेव्हा माझी अशी इच्छा होती की मराठीतला पहिला सिनेमा आपण परदेशात रिलीज करायचा. कारण चित्रपट गाजला होता, लोकांना खूप आवडला होता. त्यात लंडनमध्ये बरीच मराठी माणसं आहेत. त्यामुळे मला आपला सिनेमा लंडनमध्ये रिलीज करायचा होता. त्यावेळी संपूर्ण फॅमिलीसोबत मी लंडनला गेलो होतो. तेव्हा तिथे या सिनेमाचा प्रमिअर करता येईल का? याचा देखील विचार केला’.
लंडनमधला तो शो हाऊसफुल्ल
पुढे म्हणाले, ‘लंडनमध्ये माझा चुलत चुलत भाऊ राहत होता. मधुकर कोठारे आणि त्याची बायको शिला कोठारे ही त्यावेळी तिथे मराठी महामंडळाची अध्यक्ष का सेक्रेटरी होती. (Mahesh Kothare) आम्ही तिकडे गेल्यावर त्यांच्या पुढ्यात मी माझी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, मस्त कल्पना आहे. आपण इथे प्रमिअर करु आणि त्यानंतर तिने मराठी लोकांमध्ये त्याची जाहिरात केली. तिने सगळ्या माध्यमातून लंडनमधील लोकांना माहिती दिली आणि पुढे काही घडण्याआधीच लंडनमधला तो शो हाऊसफुल्ल झाला होता’.
शरद पवारांच्या मदतीमुळे झालं शक्य
पुढे सांगितलं, ‘त्यावेळी १३ फेब्रुवारी १९९४ रोजी आम्ही झपाटलेला सिनेमाचा लंडनमध्ये प्रमिअर केला. त्यामुळे लंडनाला मला पुन्हा जायचं होतं. पण जायचं म्हणजे खर्च करावा लागणार होता आणि मग कसं करायचं? असा माझा विचार सुरु झाला. माझी एक चुलत बहिण आहे, तिच्या मिस्टरांचे शरद पवारांसोबत चांगले संबंध होते. माझीही होती, पण त्याची जरा जास्त ओळख होती. म्हणून तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला. (Mahesh Kothare) पण त्यावेळी नुकतेच मुख्यमंत्री झाल्यामुळे ते फार व्यस्त होते. त्यावेळी बॉम्बब्लास्ट झाले होते आणि त्यामुळे त्यांना इथे मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं. त्या काळात त्यांच्या बऱ्याच भेटीगाठी सुरु होत्या. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. त्यातूनही त्यांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले तुझं काय आहे? लवकर सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये’.
‘मग मी त्यांना सांगितलं की, असं असं आहे आणि मी झपाटलेला सिनेमाचा लंडनला प्रमिअर करतोय. मी आताच जाऊन आलोय आणि त्यामुळे मला पुन्हा जाण्यासाठी तेवढे फंड्स नाहीयेत. यावर ते मला म्हणाले की, ओके मला कळालं. ही फाईल राहू दे इकडे, तू जा. मग मी गपचूप तिथून बाहेर आलो. पण मला माझं काम होईल की नाही.. याची काही श्वाश्वती नव्हती. पण २ दिवसांत मला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला की तुमचा चेक तयार आहे. या आणि तो घेऊन जा. (Mahesh Kothare) तेव्हा मी पेपरमध्ये त्याची जाहिरात देखील दिली होती. त्यात लिहिलं होतं, माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशिर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला’, असा हा किस्सा महेश कोठारे यांनी सांगितला.