ठाणे प्रतिनिधी | शुटिंग सुरु असतानाच अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर येथे माही गिलची प्रमुख भूमिका असलेल्या “फिक्सर” या वेबसिरिजचे शुटिंग सुरु होती. यावेळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनीही मदतीऐवजी त्रासच दिल्याची तक्रार अभिनेत्री माही गिल आणि दिग्दर्शकांनी केली आहे.
या हल्लात माही गिल थोडक्यात बचावल्या, मात्र शुटिंगच्या स्टाफपैकी काहीजण जखमी झाले आहेत. तसेच शुटिंगच्या साहित्याचीही मोठी तोडफोड झाली. हा सर्व प्रकार झाल्यावर पोलीस घडनास्थळी आले. मात्र, पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी वेबसिरिजच्या शुटिंगचेच सामान जप्त केले. तसेच 50 हजार रुपये देऊन कासटवाडी पोलीस स्टेशन येथून घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांच्या या कृतीवर माही गिलसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
हल्लेखोरांनी कोणतीही चर्चा न करता त्यांच्या परवानगीशिवाय शुटींग करता येणार नाही, असे सांगितले. त्यांनी महिला कलाकारांनाही वाईट पद्धतीने धक्काबूक्की केली. त्यांच्या मारहाणीत काही स्टाफ गंभीर जखमी झाल्याचीही तक्रार दिग्दर्शकांनी केली. माही गिल यांनीही आपल्यावर हल्ला झाला, मात्र आपण गाडीत गेल्याने बचावल्याचे सांगितले.