सोयगाव नगरपंचायतीवर ‘महिलाराज’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा, तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखा काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली.

यावेळी भाजपचे दोन्ही सदस्य सभागृहात गैरहजर होते. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसोबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती बाजी मारल्याने राज्यात सोयगाव नगरपंचायत निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. सोयगावात नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाचा दणका बसला आहे.

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दोन्ही महिलाच विराजमान झाल्या असून सभागृहात आठ महिला नगरसेविका राहणार असून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांनाच बहुमान दिला आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत पिठासन अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी आदींनी कामकाज पाहिले.