पुसेसावळी | शासनाच्या कायद्यात बदल करून गायराणातील आता पर्यंतची सर्व अतिक्रमणे कायम करावीत, अशी मागणी चोराडे ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की चोराडे गावात गायराण जागेत 1960 पासुन ते 2022 पर्यत 350 च्या वर घरे वसली आहेत. गावातील सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या परिसरातील ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत व वीज वितरणचे कर वेळोवेळी भरतात. तरी या अतिक्रमणातील घरे काढल्यास ही सर्व कुटुंबे बेघर होतील. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी. अतिक्रमण काढणेच्या प्रक्रियेला सध्याच्या शासन आदेशास स्थगिती देण्यात यावी.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयातील अटी व शर्तीमधील अतिक्रमण केलेले भूखंड कमाल 1500 चौरस फुटाच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात यावी. चोराडे गावात गावठाण विस्तार न झाल्याने निवासासाठी वापरलेली अतिक्रमित जमीन वगळावी, 16 फेब्रुवारी 2018 च्या निर्णयाची अंलबजावणी कायम करावी. त्या जागेचे शुल्क आकारून अतिक्रमणे नियमित करावीत. तसेच नियमानुकूल करण्यात येणाऱ्या जागेची दोन हजार चौरस फूट मर्यादेची अट शिथिल करण्यात यावी. तरी या निवेदनावर गावातील ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.