हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रकाश सोळंके (Prakash Solanke) हे माजलगाव विधानसभेतील मोठे प्रस्थ… तब्बल चार वेळा एकाच मतदार संघातून निवडून जाण्याचा रेकॉर्ड मतदारसंघात फक्त त्यांच्याच नावावर आहे… आडसकरांनी राजकारणाच्या आडून सोळंकेंना चितपट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले… पण ते सारे फेल ठरले… आत्ताही भले पक्षाने तिकीट नाकारलं तरी चालेल पण सोळंकेच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरणारच, असं म्हणत आडसकरांनी आमदारकीची माती कपाळाला लावली खरी… पण सोळंके अजित दादांसोबत आल्याने भाजपकडून तिकीट मिळण्याच्या आडसकरांच्या स्वप्नांवर आभाळ आलंय… झिरो अवरला शरद पवारांसोबत जाण्याचीही त्यांची तयारी आहे… पण सोळंके – आडसकर यांना नडणारा एक नवा भिडू माजलगावच्या राजकारणात सध्या आमदारकीची तयारी करतोय… राजकारणाच्या बाहेरच असणार हा चेहरा माजलगावच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणणार आहे… म्हणूनच सोळंके माजलगावची आमदारकी कायम राखणार का? आडसकर नेमक्या कुणाच्या आडून विधानसभेचे दंड थोपटणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजलगावात राजकीय एंट्री करणारा एक नवखा चेहरा, विधानसभेच्या पहिल्याच अनुभवात थेट आमदारकी पटकावणार का?
लोकसभेला बीड मतदारसंघात येणाऱ्या माजलगावने सोळंके – आडसकर अशी जोडगोळी महायुतीच्या बाजूने असतानाही अवघं हजाराचे लीड पंकजाताईंच्या पाठीशी दिलं… अर्थात यामुळे राष्ट्रवादीचे स्टॅंडिंग आमदार प्रकाश सोळंके यांची आमदारकी रेड झोन मध्ये दिसतेच आहे… पण भाजपच्याच उमेदवाराला लीड देऊ न शकल्यामुळे पक्षाकडे उमेदवारी कोणत्या तोंडाने मागायची? असा पेच आता रमेश आडसकरांपुढे असणार आहे… पण आमदारकीचं स्वप्न उशाला घेऊन फिरणाऱ्या आडसकरांनी काहीही झालं तरी निवडणूक लढवायचीच अशी ठाम भूमिका घेतल्याने भाजपकडून नाही… तर तुतारीकडून आणि तिथूनही नाही जमलं तर अपक्ष म्हणून आडसकर विधानसभेच्या रिंगणात दिसतील… 1999 आणि 2004 साली भाजपाच्या तिकीटावर आणि 2009 साली राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंकेनी माजलगावची आमदारकी कायम राखली… मात्र 2014 ला भाजपकडून आर.टी देशमुख यांनी पहिल्यांदाच इथे खातं खोललं पण 2019 ला भाजपने रमेश आडसकर यांना मैदानात उतरवलं… खरंतर मोदी लाट असताना भाजपच्या बाजूने सगळं काही वातावरण असताना इथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी मैदान मारत माजलगावमधलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं…
खरंतर सोळंके हे माजलगावचे चार टर्मचे आमदार… अर्थात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या वाट्याला मंत्रीपद यावं, असं वाटणं त्यांना स्वाभाविक होतं… अगदी मंत्रिपदाच्या नावांची अधिकृत घोषणा करण्याच्या आधीपर्यंत सोळंके यांचं नाव यादीत कन्फर्म आहे, असं बोललं गेलं… पण अगदी मोक्याच्या टायमिंगला त्यांना यादीतून कट्टू दिला… पक्षात पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार मंत्री होतायत पण आपल्याला डावललं जात असल्याची सल त्यांनी शरद पवारांनाही बोलून दाखवली… पण नंतर ही जखम जुनी होऊन सोळंकेंनी पक्षात स्वतःला ऍडजेस्ट करून घेतलं… पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत ते अजितदादांसोबत आल्याने माजलगावमध्ये आडसकरांची मोठी कोंडी झाली… सोळंकेही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अडचणीत सापडल्याने मराठा समाज आणि राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्यावर नाराज आहे… लोकसभेलाही त्यांना महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी अवघ हजाराचं तोडकं मोडकं लीड दिल्याने सोळंकेंच्या विरोधात तुतारीकडून तगडा उमेदवार निवडणूक मैदानात उतरला तर सोळंके यांना इथं पराभवाचा झटका बसू शकतो…
रमेश आडसकरांनीही मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे जर आडसकरांचं भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात इन्कमिंग झालं, तर सोळंकेंना तगडं आव्हान उभं राहू शकत… त्यातही कोरोना युद्धातील शिलेदार, सुप्रसिद्ध सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरातही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आल्याने इथं सोळंके – आडसकर – थोरात अशी अटीतटीची तिरंगी लढत माजलगावच्या जनतेला पाहायला मिळू शकते… थोरात यांचा भूतकाळ तसा राजकारणाशी संबंधित नाही, त्यामुळे स्वच्छ आणि क्लियर उमेदवार म्हणून त्यांचं नाव उमेदवारीसाठी जनतेतूनच समोर आलं आहे… शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर कदाचित सोळंकेंना पराभवाचा धक्का बसू शकतो… पण तसं नसेल तर सध्यातरी स्टॅंडिंग आमदारांचं वजन काकणभर का होईना, पण सध्यातरी जास्त दिसतंय…
बीड जिल्ह्यातील सर्व समृद्ध मतदार संघ म्हणून तशी माजलगावची ओळख… साखर कारखानदारी ज्याच्या ताब्यात त्याला या विधानसभेतून नेहमीच अप्पर हँड राहिलाय… उसा पाठोपाठ कापसाचे विक्रमी उत्पादन याच मतदारसंघात होतं… मात्र असं असूनही इथल्या आमदारांना माजलगावात प्रक्रिया उद्योग आणता आला नाही, रोजगार आणि एमआयडीसीच्या पातळीवरही शुकशुकाट आहे… त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर महत्त्वाचा राहिला तरी जो आपल्या समस्यांना प्रामाणिक न्याय देईल, त्याच्या पाठीशी माजलगावची जनता राहील, असा कल सध्या लोकांच्या बाजूने दिसतोय…
सोळंके विरुद्ध आडसकर अशा लढती सोबतच डॉ. अशोक थोरातही मैदानात उतरले तर माजलगावचा निकाल इंटरेस्टिंग राहील, एवढं नक्की… बाकी तुतारीकडे माजलगाव जिंकण्यासाठी अप्पर हँड असला तरी तगडा उमेदवार नसल्याने आता शरद पवार आडसकर, डॉक्टर थोरात की आणखी कुण्या चेहऱ्यावर विश्वास ठेवत माजलगावची आमदारकी लढवतील, ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…त्यामुळे माजलगाव मधून आमदारकीचा गुलाल कोण होईल? प्रकाश सोळंके, रमेश आडसकर आणि डॉ. अशोक थोरात या तिघांपैकी नेमकं पावरफुल कोण? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.