कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
कराड शहरात पाच ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवून ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून पार्सल मधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेवून एकूण 1 लाख 69 हजार 967 रूपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पकडण्यात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी रॉबिन अँथोनी आरोजा (वय 26, रा. कुचेकल कोचीण, राज्य केरळ, सध्या रा. गणेशकृपा, जाधव कॉलणी, बदलापूर, जि. ठाणे), किरण अमृत बनसोडे (वय 24, रा.चक्कीनाका, गोसावीपुरा, हाजीमलंग रोड, कल्याण पुर्व), राहूल मच्छिंद्र राठोड (वय 21, रा.गणेशकृपा, जाधव कॉलणी बदलापूर) रॉकी दिनेश कर्णे (वय 21, रा. काका ढाबा गणेश चौक, मलंगबाब रोड, कल्याण जि. ठाणे), गणेश ब्रम्हदेव तिवारी (वय 39, रा. भटवाडी घाटकोपर, मुंबई) अशा आरोपीना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात ऑनलाईनद्वारे मोबाईल मागवून कुरिअर देणाऱ्याची हातचालाखीने फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्याचे प्रमाण वाढले होते. त्या चोरांना पकडण्याचे कराड पोलीसांसमोर आव्हान होते. त्यांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास करून विविध तपास कौशल्यांचा वापर केला. दरम्यान कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी संशयीतांचा शोध घेतला. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपींना पोलिसांनी बदलापूर, कल्याण जिल्हा ठाणे येथून अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून 2 कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधारकार्ड व फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य तसेच 5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.