कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
नाना पाटेकर यांना एक मोठी गाडी घ्यायची होती. पण एक दिवस टीव्हीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची मुलाखत पत्रकार घेत होता. तेव्हा नाना एवढे दुःखी झाले, त्यांनी मला फोन केला आणि म्हटले आपण गाडी नंतर घेवू. माझ्यावतीने विदर्भात जावून मदत देवून येशील का? तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही आला असता तर आपण देवून येवू. परंतु नाना म्हणाले, नाही तू गुपचूप देवून ये, आपण गाजावाजा करायचा नाही. तेव्हा मी त्यांना म्हटले, आपल्या मदतीला मर्यादा आहेत. परंतु तुम्ही आलात तर एक चळवळ उभी राहील. त्यानंतर आम्ही बीडच्या कार्यक्रमाला गेलो. त्यावेळी जवळपास 125 बायका तरूण तीशी- चाळीच्या वयातील लहान- लहान मुलांना व पांढरी कपाळ घेवून आल्या होत्या. तेव्हा आम्हा कलाकारांचे दुः ख पाहून ह्दय फाटलं. तेव्हा नाम फाऊंडेशनची संकल्पना नानाजीच्या मनात आली, असल्याचा उलगडा सिने अभिनेते व नाम फौंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांनी केला.
उंडाळे (ता. कराड) थोर स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतिदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील होते. यावेळी रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त अँड. विजयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मकरंद अनासपुरे म्हणाले, नाम फाऊंडेशनला आज 7 वर्ष झाली. परंतु गेल्या 7 वर्षात किती बदल झाला हे गाैण आहे, यापेक्षा आमच्यात किती बदल झाला हे महत्वाचे आहे. छोटी- छोटी दुःख आभाळएवढी मोठी वाटू लागली. विनोदचा प्रवास व लोकसेवेचा प्रवास चालू रहावा. शेवटी ईश्वराकडं एकच मागणं आहे. कलावंत म्हणून जगवावं अन् कलावंत म्हणूनच न्यावं अशी इश्वर चरणी प्रार्थना करतो.
पुरस्काराची 51 हजारांची रक्कम नाम फाऊंडेशनला सुपूर्द
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप, मानपत्र, स्मृतीचिन्ह रोख रक्कम 51 हजार असे स्वरूप होते. पुरस्कार स्विकारल्यानंतर मकरंद अनासपुरे यांनी पुरस्कारांची रक्कम नाम फाऊंडेशनला जाहीर करून फाऊंडेशनचे सीईअो गणेश थोरात यांच्याकडे सुपूर्द केली.