नवरात्रीतील उपवासासाठी बनवा या झटपट रेसिपी; आरोग्य ही राहील तंदुरुस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सवात घटस्थापना करून माता दुर्गेची 9 दिवस पूजा-आर्चा केली जाते. या 9 दिवसांच्या काळात उपवास ही करण्यात येतात. या 9 दिवसात उपवास करणारे काहीजण फक्त फळेच खातात. त्यामुळे त्यांना जास्त अशक्तपणा जाणवतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या अशा दोन झटपट रेसिपी सांगणार आहोत की, ज्यामुळे तुमचा उपवासही टिकून राहील आणि शरीराला ऊर्जा देखील मिळेल. ज्याने नवरात्रीच्या काळात तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहील.

1. साबुदाणा खिचडी

साहित्य

साबुदाणा – 1 वाटी (भिजवलेला)
बटाटा (उकडलेले)
हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
शेंगदाणे 1/2 वाटी
जिरे – 1 छोटा चमचा
मिरची पावडर
मीठ
तेल

पाककृती

सर्वात प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून किमान चार तास भिजवून ठेवा.

यानंतर साबुदाणा खिचडी करण्यासाठी बटाटे उकडून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा.

पुढे तवा गरम करून त्यात शेंगदाणे टाका. (शेंगदाणे तेलाशिवाय भाजून घ्या) यानंतर ते गार करून त्याचे दाणे मिक्सरमधुन पाच सेकंद फिरवा.

आता मंद आचेवर पॅन गरम करा. त्यात सुमारे दोन चमचे तेल किंवा तूप घाला.

तेल/ तूप गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरे आणि उकडलेले बटाटे घाला.

यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ घालून नीट ढवळून घ्या.

बटाटे हलके तपकिरी रंगाचे झाल्यावर त्यात वाटलेले शेंगदाणे घालून पुन्हा नीट ढवळून घ्या.

यानंतर त्यात साबुदाणा टाका तसेच आवश्यकतेनुसार मीठ घाला. आणि ते सतत ढवळत राहा. दरम्यान गॅसची आच मंद ठेवा.

साधारण 10 मिनिटांनी गॅस बंद करा. तुमची स्वादिष्ट साबुदाणा खिचडी तयार असेल.

2 शाबुदाना इडली

साहित्य

200 ग्रॅम साबुदाणा
200 ग्रॅम दही
250 ग्रॅम वरईचे तांदूळ
अर्धा चमचा जिरे
बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ

पाककृती

सर्वात प्रथम साबुदाणा आणि वरईचे तांदूळ हे मिक्सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या.

यानंतर हे मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरे, अर्धा चमका सोडा आणि गरजेनुसार पाणी टाकून हे मिश्रण एक तास मुरत ठेवा.

पुढे इडली पात्राला तूप किंवा तेल लावून घ्या. त्यात तयार मिश्रण टाकून इडली वाफवून घ्या. अशा प्रकारे तुमची इडली तयार असेल.

चटणी

इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवा. त्यासाठी ओल्या नारळाचे खोबरे घ्या. ते बारीक कापा. यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, मिर्ची, चवीपुरती साखर घाला. आणि हे सर्व मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्या. यानंतर या मिश्रणाला तुपात किंवा तेलात अर्धा चमचा जिरे टाकून फोडणी द्या.