कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
मलकापूर पालिकने करवसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी धडक मोहीम राबवत कारवाई करत आहेत. बुधवारी पालिकेच्या पथकाने थकीत कर वसुलीसाठी 8 गाळे, 2 हॉटेल व 1 लॉज सील केले असून, काही नळ कनेक्शनही तोडली आहेत. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेने शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राजेश काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या माध्यमातून कर वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यानुसारच पालिकेने करवसुलीसाठी तर दुसऱ्या बाजूला आक्रमक धोरण अवलंबून कडक कारवाई करण्यावरही भर दिला आहे. पालिकेने आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 60 टक्के म्हणजेच सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अद्यापही पालिकेला अंदाजे साडेतीन कोटींचा कर वसूल करावा लागणार आहे.
कर भरून नागरिकांनी सहकार्य करावे : राजेश काळे
पालिकेने करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट ठेवले असून, ते आम्ही पूर्ण करणारच. त्यासाठी बक्षीस योजनेसह कायदेशीर कारवाईच्या तरतुदींचा वापर केला जाणार आहे, तसेच कर थकीत ठेवल्यास त्यावरील शासकीय व्याज वाढत असून, याचा विचार करून नागरिकांनी त्वरित कर भरणे गरजेचे आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर निरीक्षक राजेश काळे यांनी केले आहे.