कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहराशेजारील मलकापूर पालिकेने कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनावर टाळेबंदीचा परिणाम होऊन आर्थिक जीवन विस्कळित झाले आहे. तेव्हा पालिकेने लाॅकडाऊनच्या काळातील करसवलतीत सूट देवून थकीत बिलामुळे नळ कनेक्शन तोडू नयेत अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशीद यांनी पालिकेला निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनातील माहिती अशी, वर्षभर सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती आहे. पालिका हद्दीत रुग्णसंख्या व जीवितहानी रोखण्याकरिता वारंवार लॉकडाउन लावण्यात आला. १४ एप्रिल २०२० पासून आजअखेर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनावर टाळेबंदीचा परिणाम होऊन आर्थिक जीवन विस्कळित झाले आहे. संपूर्ण बाजारपेठ, व्यापारी संस्थाने, उद्योग, व्यावसायिक, फेरीवाले, रिक्षावाले व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे पालिका क्षेत्रातील मालमत्ताधारक नागरिकांना आपले कर घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छता कर भरणे मुश्कील झाले आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा. चर्चा करून पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना सवलतीचे पॅकेज देऊ दिलासा द्यावा.
पालिकेने घरपट्टी व स्वच्छता करात ५० टक्के सवलत देऊन थकीत घरपट्टीवरील व्याज माफ करावे. घरपट्टीसाठी तिमाही, सहामाही हप्ते बांधून द्यावे. पाणीपट्टी बिलात ३० टक्के सवलत द्यावी. थकीत बिलामुळे नळ कनेक्शन तोडू नये, अशी मागणी केली आहे. नितिन काशीद, रामभाऊ रैनाक, मधुकर शेलार, सूर्यकांत मानकर, संजय चव्हाण, दिलीप यादव, काकासाहेब जाधव. धनाजी पाटणकर, विजय तिवारी, संतोष वाघमारे, नरेंद्र लोहार, सुभाष भिलवडे आदींनी केली आहे.