कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी ही शिक्षा सुनावली. बाळू ऊर्फ पांडूरंग दादासाहेब पाटील (वय 52, रा. कटपाण मळा, कापिल, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे.
सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील काटपाण मळ्यात राहणार्या बाळू ऊर्फ पांडूरंग पाटील याचे दोन विवाह झाले आहेत. आपल्या पत्नीशी गावातीलच सुरेश पांडूरंग जाधव (वय 40) याचे अनैतिक संबंधित असल्याचा संशय बाळू ऊर्फ पांडूरंग याच्या मनात होता. या संशयावरून त्याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन मलकापूर येथे 13 ऑगस्ट 2015 रोजी रात्री सुरेश जाधव यांच्यावर सुरी व कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. याबाबत रोहीत दिलीप जाधव याने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून बाळू ऊर्फ पांडूरंग पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कराड शहर पोलीस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक आर. एच. राजमाने यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सोळा साक्षिदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी बाळू ऊर्फ पांडूरंग पाटील याला गुन्ह्यात दोषी धरून खुनप्रकरणी जन्मठेप व 50 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाला उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस नाईक खिलारे, गोविंद माने, धनचंद्र पाटील, कार्वेकर, महिला पोलीस नाईक रुपाली शिंदे व कॉन्स्टेबल योगीता पवार यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून अशोक मदने यांनी काम पाहिले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा