औरंगाबाद : कोरोना महामारीची दुसरी लाट संपुष्टात येत असतानाच आता तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिके तर्फे नियोजन केले जात आहे. त्यानुसार येणाऱ्या तीन महिन्यासाठी 68 कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी मनपाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर यामध्ये आठ कोटी 92 लाख रुपयांची जुनी थकबाकी असल्यामुळे एकूण 77कोटी 73 लाख रुपये मनापाला मिळावे असे या प्रस्तावात सांगण्यात आले आहे.
कोरोना महामारीची लाट नियंत्रणात आणणे, कोरोना बाधितांवर उपचार करणे, अँटीजन चाचणी, आरटीपीसीआर आणि बाधितांसाठी जेवणासोबत बाकी व्यवस्था करण्याचे काम महानगर पालिका मागील दीड वर्षांपासून करत आहे. यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत आहे.
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून महानगर पालिकेला आत्तापर्यंत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत 38 कोटी 36 लाख, त्याचबरोबर जिल्हा नियोजन समिती मार्फत 10 कोटी 12 लाख असा 47 कोटी 48 लाख रुपये निधी मिळाला आहे. त्याचबरोबर महापालिकेला अजूनही आठ कोटी 92 लाख रुपयांचे निधी मिळावा असा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याच आरोग्य विभागातून माहिती प्राप्त झाली आहे.