आंबा, द्राक्ष बागा भुईसपाट : माण तालुक्याला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांची पंचनामा करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर, शिरताव, वरकुटे- मलवडी परिसरात रात्री 10 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आबा बागायतदारांसह कारले, दोडका व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले.

या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली. देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा रात्रीच्या चक्रीवादळात भुईसपाट झाली आहे. कृष्णराव बाबर यांची आंबा बागेत कालच व्यापारी येऊन व्यवहार ठरला होता, यावेळी 140 रु. दराने संपूर्ण बाग ठरविण्यात आली होती. पुढील 8 ते 10 दिवसांत बाग उतरायची होती. मात्र, त्याआधी पावसामुळे अंदाजे 12 ते 13 टन अपेक्षित मालाचे नुकसान झाले. कृष्णराव बाबर यांचे 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काल दिवसभर पावसाचे वातावरण दिसत होते. त्यातच सूरुवातीला रात्री 10 वा. चक्रीवादळाला सुरूवात झाली. बघता बघता विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे या परिसरातील आंबा, द्राक्ष, नारळ बांगासह दोडका, कारले, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या चक्रीवादळाचा व अवकाळी पावसाच्या दणक्याने बागायतदार पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या अवकाळी पावसाचा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अजून दोन दिवस अवकाळी पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. पुढील दोन- चार दिवसांत पावसाची वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कर्जमाफीच्या आनंदावर पाणी

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशातच काल आलेल्या पावसामुळे देवापूर, पळसावडे भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या भागांत अवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली फळ, पिके तर हिरावली गेलीच आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.