नाशिक प्रतिनिधी | भिकण शेख
भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडून नोटीस मिळाली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटेंना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी अपक्ष अर्ज भरत भाजपसोबत बंडखोरी केली होती. माणिकराव कोकाटे सिन्नरचे माजी आमदार आहेत
माणिकरावांकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आहे. या आरोपाखाली एसीबीकडून माणिकरावांची चौकशी सुरू आहे. परंतु, आता एसीबीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एसीबीने चौकशीसाठी बोलावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.