मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? मनोहर भिडेंचं विधान चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा आजही राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून आजही ते मराठा समाजासाठी लढत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते सत्ताधारी भाजपवर टीकाही करत आहेत. एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून त्यातच शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी आरक्षणाच्या वादात उडी घेत वेगळंच विधान केलं आहे. मराठ्यांनो, तुम्हाला उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठे मागता? असं मनोहर भिडे यांनी म्हंटल आहे. मनोहर भिडे यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पुकारला जाणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मनोहर भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर थेट भाष्य केलं. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सवाल केला असता मनोहर भिडे म्हणाले, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण वाघ आणि सिंहाने मागावे का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे असं भिडे म्हणाले.

यावेळी त्यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर सुरु असलेल्या अत्याचारावरही भाष्य करत भारत सरकारला आवाहन केलं आहे. बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात भारत सरकारने कडक पाऊले उचलावीत असं भिडे यांनी म्हंटल. बांगलादेशमध्ये चाललेला नंगा नाच बंद झाला पाहिजे. जसे बटन दाबल्यावर दिवा बंद होतो, तसं काम या समस्येबद्दल केलं पाहिजे, भारताच्या सरकारमध्ये तशी धमक असून तसं काम त्यांनी करावं अशी मागणी मनोहर भिडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.