Manohar Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. आज पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते, बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. एक कडवट शिवसैनिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत कसा पोचला हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मनोहर जोशी याचं जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाले. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे राहिले. त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत झाले. मनोहर जोशी यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) ते अधिकारी म्हणून रुजू झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश केला आणि सक्रिय राजकारणात ते सहभागी झाले. मनोहर जोशी यांची प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम केलं आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू बनले.
शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री – (Manohar Joshi)
1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी (Manohar Joshi) याना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केलं. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरेलच याशिवाय महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला. 1995 ते 1999 या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. या काळात त्यांनी महिलांसाठी वृद्धांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना आणि तरुणांसाठी सैनिक शाळा सुरू केली.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर सुद्धा मनोहर जोशी ठाकरे कुटुंबियांच्या सोबतच राहिले. मध्यंतरी जोशींबाबत वेगवेगळ्या वावड्या उठल्या, मात्र त्यांनी ठाकरे घराण्याप्रती असलेली त्यांची निष्ठा कधी सोडली नाही. विशेष म्हणजे मनोहर जोशी यांनी ठाकरेंच्या ४ पिढ्यांसोबत काम केलं. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहेत.
मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नगरसेवक पदापासून सुरूवात केली होती. 2 वेळा नगरसेवक, 3 वेळा विधानपरिषद सदस्य, मुंबई महानगरपालिका महापौर, त्यानंतर 2 वेळा आमदार, विधानसभेत विरोधी पक्षनेता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात मंत्रिपद, लोकसभेचे अध्यक्षपद यांसारखे अनेक पदे त्यांनी उपभोगली.