मनोज जरांगे मराठ्यांनंतर धनगर, मुस्लिम आरक्षणासाठीही लढा देणार

Manoj Jarange
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Community) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्यामुळे या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जयजयकार होत आहे. आज मनोज जरांगे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी किल्ले रायगडावर येणार आहेत. यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, “मी जसा मराठा आरक्षणासाठी लढा दिला तसाच धनगर आणि मुस्लिम यांच्या आरक्षणासाठी देखील लढा देणार आहे” असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आज आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो. त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे असं माझं मत आहे. पण, त्यांनीही म्हटलं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लीम बांधव म्हणाला तर मग, मी पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही”

आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांनंतर धनगर मुस्लिम बांधवांना देखील पाठिंबा देणार असल्याचे म्हटल्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी सरकारच्या नाकी नऊ आणले आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलन थेट मुंबईच्या दिशेने वळवले होते. यावेळी त्यांच्यासोबत कोट्यावधी मराठा समुदाय होता. परंतु हे आंदोलन मुंबईला धडकण्यापूर्वीच राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.