हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना इशारा दिला आहे. मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही, फक्त आरक्षणाविषयी आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या. नाहीतर पुन्हा पाडा पाड्या झाल्या तर मग माझ्या नावाने ओरडायचं नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच मराठ्यांचे कल्याण न होण्यासाठी फडणवीसच दोषी आहेत. गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस आहेत, असा आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुमच्या राजकारणाशी मला काही देणं-घेणं नाही. ‘महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो तुम्ही खड्ड्यात जा, मात्र मराठ्यांना सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी हवी, ही मराठा समाजाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. ७ महिने झालं तुम्ही नुसती प्रक्रिया करताय. आता 2-4 दिवसांमध्ये आमच्या मागण्यांचे तुकडे पाडा, एकदा का मी मी रस्त्यावर आलो तर तुमचा खेळ खल्लास होईल. सरकारने जर मागण्या मान्य नाही केल्या तर तुम्ही फक्त आता पुढचं बघा’, आमचा कचका कसा असतो तेच दाखवतो. मराठ्यांचे पोर आता गप्प राहणार नाहीत .. २०२४ ला वाटच लावणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस याना दिला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, आमरण उपोषण कठोर करून आम्ही इथे जीवाची बाजी लावली आहे. आमचा प्रवास इथून पुढे आणखी खडतर आहे. माझ्या समाजाची लेकरं मोठी व्हावीत म्हणून हे आमरण उपोषण सुरु केलं आहे. सरकारला शेवटची संधी दिली. आम्हाला राजकारणात नाही जायचं. फक्त मराठ्यांच्या मागण्यांची अमंलबजावणी करा, माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग पाडा पाड्या कशा झाल्या याबाबाबत माझ्या नावाने ओरडू नका. मला राजकीय वाटांवर फडणवीस यांनी जाऊ देऊ नये. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. भारतात अशी जात नाही की जिने वर्षभर सरकारला सहकार्य केले. आम्ही सहकार्यच केले. आता सरकारला लाज वाटायला हवी. 2-4 दिवसांत सगळ्या विषयाची अंमलबजावणी करावी. फडणवीसांनी कितीही गणिते करू द्या सगळे गणित मोडून टाकणार. फडणवीस हेच सगळ्यांच्या आरक्षणाला अडथळा आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.