हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसणऱ्या मनोज जरांगे पाटलाना मोठं यश मिळालं आहे. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर नेमण्यात आलेल्या वंशावळ समितीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. हि मागणी आता सरकार कडून पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळवता येतील- Manoj Jarange Patil Mumbai Morcha
खरं तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 25 जानेवारी 2024 रोजी तालुकास्तरावर वंशावळ समिती गठीत केली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. या उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीला अनुसरून तालुकास्तरीय समितीला किमान सहा महिन्यांची अधिक मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींची वंशावळ तपासून त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणं, ज्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळवता येतील. हाच या समितीचा मुख्य हेतू होता. सरकारने आता या समितीची मुदतवाढ केल्याने मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) सरकार ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु होणार आहे. उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य या बैठकीसाठी दाखल होत आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो? सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर जाणार का? जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य होणार? याकडे समस्त मराठा बांधवांचे लक्ष्य लागलं आहे.




