हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला वाल्मिक कराडची उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही अशी जळजळीत टीका जरांगे पाटील यांनी केली. तसेच अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे असं म्हणत अजित पवारांनाही टोला लगावला.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे काय म्हणले ते मी नीट ऐकलं नाही, पण ते असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा कोणी असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो. जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही. आता तरी अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरं होईल. अशा माणसांना किती दिवस पाठीशी घालायचं ते अजित पवार आणि फडणवीस यांच्या लक्षात यायला पाहिजे. शब्दातून का होईना पण हे समोर आलं कि त्यांना वाल्मिक कराडची आठवण येतेय.
गुंडगिरी करणे, भ्रष्टाचार करणे, लोकांच्या जमिनी हड्पणे, किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणे, समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळवून त्याच्यातून फक्त पैसे कमवायचे, कोणालाही ब्लॅकमेल करायचे आणि काळा पैसा उभा करायचा इतकं भयंकर पाप तो करत होता. धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं.
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले होते?
जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांची सेवा करत आलो, गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून हे कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे. पण आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीवही होते. काय चुकले, काय नाही, ते न्यायालय बघेल, पण ती जाणीव नक्कीच आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली होती.




