हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरवली सराटी येथे आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज निर्णायक बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. ठीक आहे, मी आजच सागर बंगल्यावर येतो, घाला मला गोळ्या, असे म्हणत जरांगे बोलता-बोलता जागेवरून उठले आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. यावेळी समाजबांधवांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटलांनी कोणाचेही ऐकलं नाही. या संपूर्ण प्रकारानंतर आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरु आहे. त्यांनी मनात आणले तर लगेच सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करू शकतात, मात्र त्यांना तसे करायचे नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हंटल. आंतरवली सराटी येथे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस याना मराठा समाजाची माफी लागायला लागली. त्यामुळे त्यांच्या मनात माझ्या बद्दल राग आहे असं जरांगे पाटील यांनी म्हंटल. माझा इंकॉउंटर करणे किंवा माझ्या सलाईन मधून विष देऊन मला संपवणे हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे म्हणून मी सलाईन पण घेण्याचे बंद केलं. फडणवीसाना जर एवढीच खुमखुमी असेल तर बैठक संपली कि मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा. तुला माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घे असं म्हणत जरांगे पाटील स्टेजवरून खाली उतरले आणि सागर बंगल्याकडे चालत निघाले.
जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या नीट नाही. त्यांना चालताना भोवळ येतेय. गावकऱ्यांकडून रुमालच्या साहाय्याने मनोज जरांगे याना हवा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. गावकरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते सागर बंगल्यावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. कोणाचेही न ऐकता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.