हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस होता, त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती, अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एकाही नेत्याच्या सभेला, प्रचाराला जाऊ नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माता माऊली आणि माझे बांधव यांनी मला विनंती केली, सलाइन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी उपोषणाला जे बसले आहेत त्यांनीही उपोषण सोडा . मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आाहे. मला 10- 12 दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. मी जरा आराम करतो. त्यानंतर अंतरवलीला आलो की भेटू.
आरक्षण मिळवल्याशिवाय (Maratha Aarakshan) आपण शांत बसायचं नाही. ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, त्यांचा शेवट आम्हीच करणार असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकार मला बदमान करू शकते पण ते मला मॅनेज करू शकत नाहीत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राहूद्या, आपण आपले लोक सत्तेत पाठवू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा करताच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठीची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.