औरंगाबाद – तालिबानी संघटनेने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक पलायन करत आहेत. अनेक जण भारतात कुटुंबासह आश्रयासाठी येत आहेत. मात्र, सध्या अफगाणिस्तानात पोलिओचे रुग्ण आजही आढळून येत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातून ही साथ भारतात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे खबरदारी म्हणून औरंगाबाद महापालिकेने अफगाणिस्तानातून शहरात येणाऱ्या नागरिकांची माहिती मागविली आहे. त्यांचे लसीकरण करण्याची तयारी करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानाचा ताबा तालिबानी संघटनेने घेतल्यानंतर स्थलांतरासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात केंद्र शासनाने देखील अफगाणिस्तानात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक भारतात येत आहेत. पण अफगाणिस्तानात सुरू असलेल्या पोलिओच्या साथीमुळे भारतात धोका निर्माण झाला आहे. जगातील इतर देशांप्रमाणे भारतही काही वर्षांपूर्वीच पोलिओमुक्त झाला. पण केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोनच देशात पोलिओचा संसर्ग आहे.
त्यामुळे काहींच्या शरीरात पोलिओचा विषाणू असू शकतो. त्यांच्यामार्फत भारतात पुन्हा पोलिओचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानातून येणाऱ्यांचे पोलिओ लसीकरण करण्याचे आदेश शासनाने महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने औरंगाबाद विमानतळ व्यवस्थापनाला एक पत्र दिले असून, अफगानिस्तातून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती चोवीस तासाच्या आत महापालिकेला कळवावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
शरीरात असू शकतो विषाणू
अफगाणिस्तानातून येणाऱ्यांच्या शरिरात पोलिओचा विषाणू असू शकतो. त्यामुळे भविष्यात भारतात प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आत्तापासून काळजी घेण्यात येत आहे, भारतात लहान मुलांना तोंडावाटे पोलिओचा डोस दिला जातो. त्याचप्रमाणे अफगानिस्तातून येणाऱ्यांना देखील तोंडावाटे हा डोस दिला जाईल. यासोबतच पोलिओचे इंजेक्शनही टोचले जाणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.