औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाउन लावण्यात आले आहे. आता कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभर लसीकरण मोहीम सुरु आहे. आज लसींचा पुरवठा नसल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. परंतु कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 40 हजारांच्या पुढे नागरिक वेटिंगवर असून शासनाने ठरवून दिलेले 84 दिवस केव्हाच संपले आहे.
दुसऱ्या डोससाठीच नाही तर पहिल्या डोससाठी देखील नागरिकांची तारांबळ उडत आहे. परंतु प्रशासनाचे केंद्र शासनाकडून केव्हा लस मिळतील याकडे लक्ष लागून आहे. आतापर्यंत 18 वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे 10 लाख असल्याचे मानले जात असून महापालिकेला 20 लाख लसींच्या साठ्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून सतत सूचना केल्या जात असून लसींचा साठा मुबलक असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
महानगरपालिकेने आतापर्यंत 5 लाख 23 हजार लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. तरीही दोन्ही लस घेणाऱ्यांची संख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आणि 12 जुलैपर्यंत पहिला डोस 7,35,019 तर 13 जुलैपर्यंत 2,13,731 दुसरा डोस देण्यात आला होता. 18 वर्षांवरील नागरिकांची म्हणजे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या ही 32 लाख 87 हजार आहे. जानेवारी महिन्यात हेल्थलाइन वर्कर, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील विविध आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात आली होती.