२ महिन्याचा पगार न दिल्याने मानसिक धक्क्यातून स.पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या..

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोलीस आयुक्त, उपायुक्त जबाबदार असल्याचा चिठ्ठीत उल्लेख

अमरावती प्रतिनिधी | आजारी रजा काळासोबत कर्तव्यावरील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अमरावतीच्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या आत्महत्येस तत्कालिन पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि लिपिक जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. अमरावती पोलीस खात्यात ते कार्यरत होते.

हाती मिळालेल्या माहितीनुसार रामसिंग गुलाबसिंग चव्हाण (56) असे मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 32 वर्षांपासून पोलीस सेवेत असलेले ए.एस.आय. रामसिंग चव्हाण यांच्या पश्चात पत्नीसह दोन मुले आहेत. पत्नी अनिता ह्या अमरावती महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. एक मुलगा पुणे आणि दुसरा मुलगा अमरावतीत शिक्षण घेत आहे.गतवर्षी ड्युटीवर असताना रामसिंग यांचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे रामसिंग ड्युटीवर हजर राहू शकले नाही. या काळात त्यांचे वेतन काढण्यात आले नाही.

प्रकृती बरी झाल्यानंतर रामसिंग कर्तव्यावर रुजू झाले. परंतु त्यानंतरही त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही.त्यामुळे कर्जबाजारी होऊन पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला पैसे पाठविणे रामसिंग यांच्यासाठी अशक्य झाले होते. म्हणून ते मानसिक तणावात होते. रविवारी 10 मार्च रोजी रात्रीची ड्युटी केल्यानंतर साप्ताहिक सुट्टी असल्याने रामसिंग सोमवारी घरीच होते. पत्नी ड्यूटीवर आणि मुलगा अमन महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांनी बंद घरात गळफास लावून आत्महत्या केली.रामसिंग यांनी मृत्यूपूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. तत्कालिन पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि लिपिक आपल्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार करू नये, असे त्यांनी चिठ्ठीत स्पष्ट म्हटले आहे. पत्नीची माफी मागून मुलांची काळजी घेण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी चिठ्ठीतून केले आहे.