औरंगाबाद – मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर आतापर्यंत नांदेड येथे बैठक घेण्यात येत होती. परंतु आता पहिल्यांदाच औरंगाबादेत आज लोकनेत्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यअर्थमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितील रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेतून औरंगाबादला काय मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यतः आज होणाऱ्या बैठकीत सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय यावेळी रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली जाणार असून सदरील बैठक ही आज दुपारी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी रेल्वे प्रश्नांवर विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी मराठवाडा रेल्वे समितीच्या वतीने अनेक रेल्वेप्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली आहे.
त्यात बऱ्याच दिवसांपासून पिटलाईनचा प्रश्न प्रलंबित असल्याने नवीन रेल्वे धावत नाही. त्यामुळे पिटलाईन लवकरात लवकर व्हावी. याशिवाय दुहेरीकरणाचा प्रश्न देखील बाकी आहे. तो मार्गी लागावा. याशिवाय औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव यासाठी निधी मिळावा. जालना-खामगाव ला निधी मिळावा. तसेच पुणे- नगर मार्गाचा सर्व्ह लवकरात लवकर करण्यात यावा. या मागण्या केल्या आहे. रेल्वेच्या या प्रश्नांवर चर्चा होईल आणि ते लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा मराठवाडावासीयांना लागून आहे.