औरंगाबाद । मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. २३ जुलै रोजी कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठी क्रांती मोर्चाच्या काळात काकासाहेब शिंदे या तरुणानं औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती. याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणानं नदीत जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचं आक्रमक रुप बघायला मिळालं होतं. त्याच्या स्मृतिदिनीच हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, क्रांती मोर्चा आंदोलनावर ठाम आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”