हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने मराठा समाजामध्ये अस्वस्थता वाढली असून राज्य शासनाने कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याचा आरोप मराठा संघटनांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी ‘सकल मराठा समाज’ आणि ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर येत्या ७ नोव्हेंबर रोजी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाकडून मशाल मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षण ही मोर्चाची महत्त्वाची मागणी असल्याने या अनुषंगाने प्रमुख मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या.
या आहेत प्रमुख मागण्या
१) मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.
२) सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
३) मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित केले जावेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’