हुंडा बंद, प्री- वेडिंगही नको; लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता

Maratha community's code of conduct for marriage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीच्या आई वडिलांनी करोडो रुपये खर्च करून अगदी थाटामाटात वैष्णवीचे लग्न लावून दिले… ५० तोळे सोने, चांदी, मानपान, कपडे, यासाठी करोडो रुपये घालवून आपल्या लेकीची सासरी पाठवणी केली. मात्र सासरच्या छळामुळे वैष्णवी आणि तिच्या घरच्यांना केवळ नरकयातनाच भोगाव्या लागल्या. अखेर वेदना आणि मानसिक छळ असह्य होऊन वैष्णवीने आत्महत्या केली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रकरणाची चर्चा सुरु आहे. शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे या गोष्टीही यानिमित्तानं सर्वांच्या समोर आल्या. आता या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने मोठं पाऊल उचललं आहे. मराठा समाजाने लग्न समारंभांसाठी नवीन आचारसंहिता लागू केली आहे. अहिल्यानगरमध्ये त्यासाठी विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

लग्न (Marriage) अगदी साध्या पद्धतीने करा, प्रीवेडींग शूट बंद करा, लग्नातील हुंडा देण्याची प्रथा बंद करावी, यांसारखे नियम बनवणारी आचारसंहिता मराठा समाजाने जाहीर केली आहे. या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार मराठा समाजाकडून करण्यात येणार आहे. तसंच या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 11 जणांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे. यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल आणि मुला-मुलींच्या आईवडिलांचा आर्थिक ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

काय आहे लग्न समारंभासाठी आचारसंहिता

1) लग्न सोहळा (100/200) मर्यादित लोकात केला जावा.
2) लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा
3) प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये.
4) लग्नात डीजे नको.पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या.
5) कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे.
6) कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत.
7) हार घालताना नवरा नवरीला उचलू नका.
8) नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.
9) जेवणात 5 हून अधिक पदार्थ नकोत.
10)लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत.
11) लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.
12) लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये.
13) लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी.
14) लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये.
15) पैशासाठी सूनेचा छळ करू नये.
16) समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा. नुसत्या शुभेच्छा नकोत.
17) विविध कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन प्रसंगी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी.
18) दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करा. लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा. श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा.