हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललं आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार
‘मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको’, अशा भावना विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’