जेजुरी | मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांचे आत्महत्येचे सत्र सुरुच असून काल दत्तात्रय शिंदे नावाच्या युवकाने रेल्वे रुळावर आत्महत्या केली. शिदे हे पिंगोरी या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गावचे रहिवासी असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शिंदे यांनी पुणे कोल्हापूर लोहमार्गावर रेल्वे खाली आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांचे वय ३४ वर्षे होते.
दत्तात्रय शिंदेच्या मागे त्यांचा चार वर्षाचा मुलगा असून गर्भवती पत्नी आहे. आई, वडील आणि एक अविवाहित भाऊ असा परिवार आहे. शिंदे कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत गावकऱ्यांनी दत्तात्रय शिंदेचा मृतदेह घेण्यास नकार दिला. तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्या नंतरच मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्तात्रय शिंदे यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करत आहे असे लिहले आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणे चुकीचे आहे. आपण आत्महत्येचा पर्याय निवडू नका असे आवाहन मराठा समाजाच्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी केले आहे.