मुंबई । राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र ,सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बंद मागे घेण्याबाबत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. या संदर्भात काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी सांगितलं की, रात्री उशीरा बैठक झाली. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत आहोत.
दरम्यान, मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरूवात होत आहे. राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हा एल्गार आता थांबणार नाही, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. तुळजापुरातून सुरू होणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वात पन्नास हजाराहून अधिक मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”