मराठवाड्याला पावसाने झोडपले; औरंगाबाद, जालना, बीड, परभणीत सर्वदूर पाऊस

Aurangabad Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस काळ रात्रीपासून धो-धो बरसत आहे. आज पहाटेच पावसाने संपूर्ण मराठवाड्याला झोडपून काढले यामुळे बळीराजा सुखावला असला तरी बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच १० सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे.

औरंगाबादेत धुवाधार पाऊस, धुळे-औरंगाबाद महामार्ग बंद –
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रं. २११ वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच चिखल, राडारोड्यात वाहने अडकल्याचे सांगितले जात आहे. कन्नड घाटातून वाहने आणू नये, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे.

जालन्यात अतिवृष्टी –
जालना जिल्ह्यात आज पहाटे सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात जिल्ह्यातील आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी मंडळात तब्बल 121.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच डीगोद्री विभागात अंतरवाली सराटी, नालेवाडी आदी ठिकाणी पहाटे दोन वाजेपासुन जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. नालेवाडी येथील मांगनी नदी , अंतरवाली सराटी येथील सुखी नाला, लेंडी नाला येथे पाणी आले आहे. भागात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांगनी नदीला पाणी आल्याने वडीगोद्री ते भांबेरी रस्त्यावर वाहतुक बंद झाली आहे. नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी, दह्याळा, भांबेरी या गावांचा संपर्क तुटला आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा कहर –
बीड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत, तर नदी-नाले, ओढे देखील दुथडी भरून वाहू लागले आहे. जिल्ह्यातील मणकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह अनेक नद्यांना पूर आला असून दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे ऊस, मका, कापूस ही पिकं देखील आडवी झाली आहेत. बीड जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. मात्र काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना फटका बसला आहे.

परभणीत जोरदार पाऊस, येलदरी धरणात ८६ टक्के पाणीसाठा –
परभणी व परिसरात सकाळी दीड ते दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा अंदाज येत होता. त्यानंतर मंगळवारी पहाटे पासूनच परभणी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. परभणी शहरात गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. परंतु, मोठा पाऊस झाला नव्हता. मंगळवारी पहाटेपासूनच परभणी तालुक्यातील सर्वच गाव शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील प्रकल्प भरले आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्याप या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नाही. परंतु पाऊस असाच सुरू राहिला तर दोन दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस –
लातूर व परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण झाले आहे. परंतु यामुळे रस्त्याची दुरावस्था व सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आलेली आहे. सोमवारी सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी लागल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. औराद शहाजनीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील जामखंडी जवळील निलंगा-भालकी, बिदर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहून पूल वाहून गेल्यामुळे हा मार्ग बंद झालेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आंबेवाडी मार्गे मिरकल -बेलूर -हुलसुर असा लांबचा प्रवास करून राष्ट्रीय महामार्गावर परत यावे लागत आहे. पुल कर्नाटकाचा वाहून गेला तरी त्रास महाराष्ट्रातील वाहनचालकांना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण या महामार्गावरून खूप मोठ्या प्रमाणात मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केली जात असते.

यासोबतच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.