समुद्रात क्रूझवर अडकलेल्या १४६ जणांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या महिन्याभरापासून मरिला डिस्कव्हरी या क्रुझ शिपवर अडकून पडलेल्या नाविक आणि खलाश्यांच्या सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे अखेर या १४६ खलाशी आणि नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी, कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर ही परवानगी देण्यात आली. केंद्राच्या या परवानगीनुसार, उद्या सकाळपासून या क्रूझवरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

२ ते ६ एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होती. दरम्यान करोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने लाएम चाबँग या थायलँड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ १२ एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास करोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलँड सोडून ३७ दिवस होऊन गेले होते मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सागितले तरी परवानगी मिळत नव्हती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर प्रधान सचिव विकास खारगे, आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी सातत्याने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला. त्यानंतर काल यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक आदेश काढला. यात व्यापारी व व्यावसायिक जहाजांवरील कर्मचारी, खलाशी यांना भारतीय बंदरांवर उतरणे तसेच बंदारांवरून जाणे शक्य व्हावे म्हणून निश्चित कार्यपद्धती दिली आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती कळविणे, तसेच बंदरावर उतरल्यावर कोविड चाचणी करून घेणे, प्रसंगी क्वारंटाईन करणे, या खलाशी व कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनाची व्यवस्था आदी बाबींचा समावेश आहे. याचा फायदा समुद्रात सध्या विविध जहाजांवर अडकलेल्या ३५ ते ४० हजार भारतीय खलाशांना होणार आहे. ही क्रुझ पुढे नॉर्वेसाठी रवाना होणार आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.

Leave a Comment